Saturday, February 1, 2020

'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया....' - साहिर लुधियानवी !! - ओंकार करंदीकर


 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया....' -  साहिर लुधियानवी !! -  ओंकार करंदीकर


Artcile on Sahir Ludhianvi by Onkar Karandikar


संगीत ऐकणं हा माझ्या जगण्याचा एक खूप मोठा भागच बनून गेलेला आहे. त्यातही जुन्या हिंदी चित्रपटातली म्हणजे 'गोल्डन एरा' मधली गाणी ऐकणं मला खूप आवडतं. सगळीच जुनी गाणी आवडतात असं नाही, पण प्रमाण नक्कीच खूप जास्त आहे.

आई ने लावलेल्या रेडिओमुळे अगदी लहान असल्यापासून नकळत ही गाणी कानावर पडत गेली आणि आपोआप आवडत ही गेली. पुढे मोठं झाल्यावर मोबाईल आणि इंटरनेट मिळाल्यावर कुठलंही चांगलं गाणं कानावर पडलं की ते लगेच सर्च करून ऐकायचा छंद चं लागला, हळुहळू त्याचं वेडात रूपांतर झालं आणि मग एकचं गाणं अनेक वेळा लूप वर लावून ऐकणं सुरु झालं. मग गाण्यांच्या अनुषंगाने आजूबाजूचं वाचणं सुरु झालं. बाबांनी माझं हे वेड (त्यांच्या कडूनच आलं असावं) पाहून २ सुंदर पुस्तकं हातात ठेवली ती वाचून ज्ञानात भरपूरचं भर पडली, पण त्याही पेक्षा जास्त गोल्डन एरा विषयी प्रेम अधिकचं वाढलं.
(ह्या पुस्तकांची नावं मी मुद्दाम इथे नमूद करेन- माधव मोहोळकर यांचं 'गीतयात्री' आणि अंबरीश मिश्र यांचं 'शुभ्र काही जीवघेणे'.) शिवाय 'क्लासिक लिजंड्स विथ जावेद अख्तर' आणि 'गोल्डन एरा विथ अन्नू कपूर' हे शोज ही होतेच सोबतीला.

आता या सगळ्या मध्ये गाण्याचं सुंदर म्युझिक ऐकणं तर आलंच, पण सर्वप्रथम कुठे लक्ष जात असेल तर ते शब्दांवर आणि ह्या वेड लावणाऱ्या शब्दांचा जन्मदाता कोण हे शोधणं हे तर बाय डिफॉल्टच होऊ लागलं आणि ते आजही चालूच आहे. जसं जसं मी ह्या जुन्या गाण्यांमध्ये खोल खोल घुसत गेलो तसं तसं मग अनेक गायक-गायिका, संगीतकार आणि गीतकार माहित झाले, त्यातले काही हृदयात एकदम उच्च स्थानी जाऊन बसले. काहींपुढे नतमस्तक झालो.

अशाच महान लोकांच्या मांदियाळीत एक माणूस होता ज्यानी खूप मोजकं काम केलं पण ते असं केलं की त्याच्या शब्दांची लोकं आजही आठवण काढतात आणि काढत राहतील. त्याच्या शब्दांनी लोकांना जगायला शिकवलं, वेगळी दृष्टी दिली, त्यांच्या दुःखावर फुंकर घातली आणि काळजात आग ही पेटवली. त्याला ही दुनिया जशी दिसली तशी त्यानी परखड पणे आणि अत्यंत चोख शब्दात आपल्या लेखणीतून मांडली. अत्यंत प्रामाणिक पणे सांगायचं तर त्याची उर्दू शायरी काही फारशी मी वाचलेली नाही अजून पर्यंत, पण त्यानी त्याच्या फिल्मी गाण्यांत  सुद्धा अशी पोएटिक डेप्थ दिली की ती गाणी फिलॉसॉफी बनून गेली.

त्याचं नाव होतं साहिर लुधियानवी!!

त्यानी गुरु दत्त सारख्या महान फिल्म मेकर्स सोबत आणि एस डी बर्मन, ओ पी नय्यर सारख्या महान संगीतकारांसोबत काम केलं. मोहम्मद रफी नी त्याची कित्येक गाणी गायली.

फाळणी नंतर साहिर मुंबई ला आला. आपसूकचं हिंदी चित्रपट सृष्टीत आपली किस्मत अजमावू लागला. त्याआधी आत्ताच्या पंजाब मधील लुधियाना इथे तो जन्मला, १० व्या वर्षी आई बाप वेगळे झाल्यावर, श्रीमंत बापाला सोडून आई सोबत गेला. त्याच्या त्या वेळच्या आणि नंतर च्या ही खाजगी आयुष्यात मला शिरायचं नाही.  हा थोडा तपशील अश्या साठी दिला की काय परिस्थितीत तो मोठा झाला. श्रीमंत घरात जन्मलेला असूनही ही रस्त्यावर फिरून सामान्य लोंकांचं जीवन त्यानी खूप जवळून पाहिलं, नव्हे ते तो स्वतःच जगला. २३-२४ वर्षाचा असताना त्याच्या उर्दू गझल्स आणि कवितांचा संग्रह लाहोर मध्ये प्रसिद्ध झालेला होता आणि तरुणांना त्यांनी वेड लावलेलं होतं.

बरेच वेळा गाण्याची ट्यून आधी बनते आणि त्यावर शब्द गीतकाराकडून लिहून घेतले जातात आणि त्यातही बेमालूमपणे  सुंदर लिहिणारे मजरूह सुलतानपुरी आणि शैलेंद सारखे प्रतिभावान आणि महान गीतकार त्यावेळी बॉलीवूड ला लाभलेले होते, साहिर ने ही काही वेळा अशी गाणी लिहिली आणि छान च लिहिली पण अनेकवेळा असंही झालं की साहिर ने आधीच लिहिलेल्या नज्म आणि गझल्स वाचून संगीतकारांना मोह आवरला नाही आणि त्यांनी त्या थोडे बदल करायला सांगून किंवा जश्या च्या तश्या सुद्धा फिल्म्स मध्ये वापरल्या.

साहिर काय ताकदीचं लिहायचा याची काही उदाहरणं मी देतो. सोपं आणि तरीही खूप परिणामकारक, खोल लिहिणं सगळ्यात जास्त अवघड असतं. ते त्याला साधलेलं होतं. वेगवेगळ्या मूड्स ची गाणी त्यानी लिहिली.

'तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले, 
अपने पे भरोसा है तो एक दाँव लगा ले''

हे 'बाजी ' चित्रपटातलं गीता दत्त ने गायलेलं गाणं ही असंच कमाल! सिनेमातल्या 'देव आनंद' च्या सिचुएशनला तर लागू होईल चं पण सिनेमाच्या बाहेर खऱ्या आयुष्यात सामान्य माणसाला ही खूप मोठा आधार आणि उमेद देईल असे या गाण्याचे शब्द. तीनही अंतरे सोपेपण खूप काही सांगून जाणारे लिहिलेत.

'डरता हैं जमाने की निगाहों से भला क्यूँ ?
इंसाफ़ तेरे साथ है, इल्ज़ाम उठा ले' 

सतत आपण लोकं काय म्हणतील म्हणून अनेक निर्णय घेताना घाबरतो त्यावर साहिर ने नेमकं बोट ठेवलंय.

नंतर तो असं लिहितो की,

टूटे हुए पतवार है कश्ती के तो ग़म क्या?
हारी हुई बाहों को ही पतवार बनाले' 

म्हणजे किती ही अडथळे आले आणि थकलेले असलो तरी 'शो मस्ट गो ऑन' !

आणि तो असंही म्हणतो की सगळंचं जगणं स्वतःहा साठी नसतं कधी तरी दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून आपण खेळ सुरु ठेवला पाहिजे आणि त्यात हरलो तरी बेहत्तर.

'क्या खांक वो जीना है जो अपने ही लिए हो
खुद मिट के किसी और को मिटने से बचाले' . 

साहिरचं असंच अजून एक जीवन तत्वज्ञान सांगणारं गाणं आहे आणि ते तर खूपचं फेमस आहे.
'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, 
हर फ़िक्र को धुवें में उडाता चला गया' 

या मध्ये एक प्रकारचा बेफिकीरपणा आहेच पण अनेक संकटं, दुःखं आणि धक्के पचवून आलेली विरक्ती सुद्धा आहे, कारण याच गाण्यात साहिर पुढे म्हणतो-

'ग़म और ख़ुशी मैं फ़र्क न महसूस हो जहाँ,
मैं दिल को उस मक़ाम पे लाता चला गया'

या ही गाण्याचे पूर्ण लिरिक्स इथे द्यायला मला आवडलं असतं, पण साहिर च्या सगळ्याचं गाण्यांचे शब्द इतके सुंदर असतात आणि एक दोन ओळी नव्हे तर संपूर्ण गाणं सुंदर असतं हे वैशिष्ठ्य आणि हे सगळंच इथे लिहीत बसलो तर हा लेख म्हणजे नुसतं गाण्यांचं संकलन होऊन बसेल त्यामुळे मी नाईलाजाने  पुढे जातो.

हिंदू-मुसलमान संघर्ष असेल नाहीतर अजून कुठला धर्मावर किंवा जातीभेदावर आधारलेला संघर्ष असेल, शेकडो वर्ष झाली, माणसाची इतकी प्रगती झाली तरी समाजाला लागलेली ही कीड काही अजून गेलेली नाही, त्या विषयी साहिर नी ६० वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीताचे काही शब्द सांगतो आणि आता ही आजूबाजूला जे चाललंय ते बघता तरुणांनी ते खरोखरच आत्मसात करावे आणि प्रौढांनी ही केले तर उत्तमचं.

साहिर नी लिहिलं होतं-

'तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा,
इन्सान की औलाद है तू इन्सान बनेगा' 

हे गाणं जर पूर्ण ऐकलं तर असं लक्षात येईल की, जन्माला येताना सगळी बाळं सारखीच असतात निरपराध निर्गुण, नंतर त्यांच्यावर धर्माचे जे संस्कार होतात त्यामुळे त्यांची मानसिकता तशी बनत जाते आणि हे सगळं आता थांबलं पाहिजे यावर साहिर एका ओळीत लिहितो की-

'तू बदले हुए वक़्त की पहचान बनेगा .. ' 

अजून एक महत्वाची गोष्ट इथे सांगितलीच पाहिजे.

'ताजमहाल' हे प्रेमाबिमाचं प्रतीक आणि जगातलं एक आश्चर्य मानलं जातं, पण ते बांधण्यासाठी त्या मुघल बादशहाने हजारो सामान्य माणसाचं रक्त सांडलं, त्यांचं जीवन उध्वस्त केलं हे आपण विसरतो पण साहिर ते विसरला नाही.  त्याची एक अत्यंत सुंदर नज्म आहे-

'मेरी महबूब कही और मिला कर मुझसे... ' 

ह्यात तो बादशाह ने सामान्य लोंकांवर केलेल्या जुलमांविषयी तर लिहितोचं आणि असंही  म्हणतो की ज्या सामान्य लोकांच्या बळावर हा ताजमहाल बांधला गेला त्यांच्या प्रेमाचं काय ?त्यांनीही प्रेम केलं असेल, त्याची काहीच किंमत नाही ? का तर ते गरीब होते म्हणून ?

'एक  शहंशाह ने दौलत का सहारा लेकर 
म ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़ ' .

'प्यासा' हा गुरु दत्त ने बनवलेला एक महान चित्रपट होता. त्यात अर्थातच साहिर ची गाणी आणि नज्म होत्या. खरतर साहिरच्याचं आयुष्यावर हा चित्रपट लिहिलंय की काय असं वाटावं इतकं त्याच्या आयुष्यात आणि चित्रपटातल्या नायकाच्या आयुष्यात साधर्म्य होतं आणि त्यामुळे साहिर ने लिहिलेली सगळी गाणी इतकी आतून आलेली आहेत.

मी फक्त्त त्यातल्या २ गाण्यांविषयी सांगतो. ही दोन्ही ही गाणी काळीज पिळवटून टाकतात. त्याला एस डी बर्मन साहेबांनी इतकं अप्रतिम संगीत दिलेलं आहे, कुठेही ते शब्दांना वरचढ होणार नाही, फक्त त्यांना सोबत घेऊन पुढे जाईल याची त्यांनी काळजी घेतलेली आहे, काही वेळा कमी संगीत आणि मिनिमम ऑर्केस्ट्रायझशन खूप प्रभावी होऊन जातं.

त्यातलं एक गाणं आहे-

'जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला
हमने तो जब कलियाँ मांगी, काटों का हार मिला '

हे संपूर्ण गाणं अतिशय सुंदर आहे, पण नुसता हा मुखडा ऐकला तरी कळतं ते लिहिणाऱ्याची अवस्था काय असावी आणि जगात अशी अनेक लोकं आहेत ज्यांचं कोणावर तरी खरं पण एकतर्फी प्रेम असतं आणि ते कधीच यशस्वी होण्याची शक्यताही नसते किंवा ज्यांचं ब्रेक-अप झालेलं असतं ... अश्या सगळ्यांच्या काळजाला साहिर एका ओळीत हाथ घालतो.

ह्यात सगळयात महत्वाचं असं की या ही परिस्थितीत तो जीवनाशी असलेली झुंज सोडत नाहीये, कारण तो पुढे म्हणतो -

'इसको ही जीना कहते है तो यूँही जिलेंगे.. '

आता दुसरं गाणं- मोहोम्मद रफ़ी साहेबांनी गायलेलं हे माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे.

'ये दुनिया अगर मिल भी जाये  तो क्या है....  ' 

पुन्हा मी तेच सांगतोय असं वाटेल पण खरोखरचं साहिर ने हे गाणं इतकं आतून काढून लिहिलंय आणि अशक्य सुंदर लिहिलंय. इतकी वेदना मी कधीच कुठलं गाणं ऐकताना अनुभवलेली नाही. ह्यात बर्मन साहेबांना, रफी साहेबांना आणि हा चित्रपट बनवणाऱ्या आणि त्यात कामही करणाऱ्या गुरू दत्त ला तर माझं नमन आहेच पण ह्या साहिर चं काय करायचं मला अजून कळलेलं नाही. तो जेव्हा लिहितो ते आपल्या च मनातलं तो सांगतोय असंच नेहमी वाटतं आणि म्हणून च तो इतका महान आहे.

आता हे पूर्ण गाणं तर इथे देणं शक्य नाही पण २-३ ओळी दिल्याशिवाय मला राहवणार नाही म्हणून देतो-

या जगात प्रत्येकाला काही ना काही त्रास, दुःख असतंच आणि आपण उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला हेच दिसेल, साहिर नि लिहिलंय-

हर एक ज़िस्म घायल, हर एक रूह प्यासी
निगाहों में उलझन, दिलों में उदासी 
ये दुनिया है या आलम-ए-बदहवासी

भीषण नैसर्गिक आपत्ती किंवा आतंकवादी हल्ले किंवा काहीही कारणांनी जेंव्हा सहज माणसं आपला जीव गमावतात किंवा एकमेकांचा जीव घेतात किंवा आपल्या जवळच्या लोकांना फसवतात ना तेव्हा मला तरी नेहमी असा प्रश्न पडतो की माणसाच्या अस्तित्वाला खरंच काही अर्थ आहे का सगळा कठपुतळीचा खेळ आहे. त्याविषयी साहिरने इतकं चपखल लिहिलंय-

जहाँ एक खिलौना है इंसान की हस्ती 
ये बस्ती है मुर्दा परस्तों की बस्ती 
यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती 

ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है 
वफ़ा कुछ नहीं, दोस्ती कुछ नहीं 
यहाँ प्यार की क़द्र ही कुछ नहीं है 

ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है!

आता एवढं सगळं वाचून तुम्हाला असं वाटेल की हा माणूस नेहमी जीवन तत्वज्ञान, शोकांतिका आणि भीषण सत्यच लिहितो का? हा काही रोमँटिक लव्ह सॉंग्स वगैरे लिहितो का नाही ?

तर त्याचं उत्तर असं आहे की नक्कीच लिहितो आणि खूप उच्च दर्जाचं लिहून जातो!

मी आत्तापर्यंत ऐकलेल्या रोमँटिक/लव्ह सॉंग्स पैकी सगळ्यात आवडलेली २ गाणी म्हणजे-

पहिलं राजा मेहदी अली खान नी लिहिलेलं, मदन मोहन साहेबांचं संगीत असलेलं आणि  लता मंगेशकर नी गायलेलं   'लग जा गले.. ' .
दुसरं साहिर नी लिहिलेलं, जयदेव साहेबांचं संगीत आणि रफी-आशा नी गायलेलं  'अभी न जाओ छोड़कर.. '.

इतकं डीप रोमँटिक आणि आर्त-तरल मी दुसरं काहीही ऐकलेलं नाही. अर्थात ती गाणी ज्यांनी संगीत बद्ध केली आणि गायली त्यांना क्रेडिट आहेच पण ज्यांनी लिहिलं त्यांची किती कमाल आहे.

साहिर नी लिहिलेलं अजून एक सुंदर रोमँटिक गाणं आहे, मुकेश नी गायलंय पण मस्तंच!

तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं 
तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी 

आता ही जलन सगळ्यांनीच कधी ना कधी अनुभवलेली असते, पण ती बरोबर शब्दात पकडणारा साहिर एक असतो.

दुसरं  एक गाणं गाणं आहे-

प्यार पर बस तो नहीं है मेरा, लेकिन फिर भी 
तू बता दे के तुझे प्यार करू या ना करू 

समोरच्या च्या मनात नक्की काय चाललंय याचा अंदाज घेत घाबरत आपल्या मनातलं सांगण्याची धडपड याहून सोप्या शब्दात मांडता येईल का ?

साहिर चं अजून एक वेगळ्या मूड चं गाणं आहे, खरंतर ती आधी कविता होती आणि नंतर ते सिनेमा त गाणं म्हणून घेण्यात आलं.

'चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनों ' 

या गाण्यातली माझी सगळ्यात आवडती ओळ आहे-

वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन 
उसे एक खूबसूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा 

खरच लिहावं तितकं कमीच आहे. त्यामुळे आता  वेगवेगळ्या मूड्स ची काही गाणी फक्त लिस्ट करतो त्यांचे लिरिक्स सांगत बसत नाही, पण तीही जरूर ऐकावी अशीच आहेत.

'कभी कभी मेरे दिल में ख़याल आता है',

'मन रे तू काहे ना धीर धरे?',

'कभी खुद पे कभी हालात पे रोना आया'',

'तुम अगर साथ देने का वादा करो'',

'ज्याने क्या तूने कहीं'',

'ना तो कारवां की तलाश है'',

'ए मेरी ज़ोहरजबीं' ',

 'साथी हाथ बढ़ाना '

'तुमसा नहीं देखा' 


'वादा करो नहीं छोड़ोगी तुम मेरा साथ'

'लागा चुनरी में दाग'

'ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं'

'निगाहें मिलाने को जी चाहता है'

'तेरे चेहरे से नज़र नहीं हटती'

'दुखी मन मेरे सुन मेरा कहना'

'जीवन के सफ़र में राही'


'किसी पत्थर की मूरत से मुहब्बत का इरादा है'

जाता जाता शेवटचं एक गाणं  सांगतो, कारण ते गाणं साहिरला डिफाईन करतं असं मला वाटतं.
इतकं सगळं लिहून सुद्धा नम्रपणे तो म्हणतो-

मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है

मुझसे पहले कितने शायर, आए और आकर चले गए,
कुछ आहें भरकर लौट गए, कुछ नग़मे गाकर चले गए

वो भी एक पल का किस्सा थे, मै भी एक पल का किस्सा हूँ
कल तुमसे जुदा हो जाऊँगा, जो आज तुम्हारा हिस्सा हूँ

कल और आएंगे नग़मों की खिलती कलियाँ चुनने वाले
मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले

कल कोई मुझको याद करे, क्यूँ कोई मुझको याद करे
मसरूफ़ ज़माना मेरे लिये, क्यूँ वक़्त अपना बरबाद करे


मैं पल दो पल का शायर हूँ ... 

- ओंकार करंदीकर ©