Thursday, September 4, 2014

चित्रकला !! (…. .???)हस्तकला!! (……??) - ओंकार करंदीकर .

चित्रकला !! (…. .???)हस्तकला!! (……??) 
           
        'एखाद्या माणसाची आणि आपली wavelegth का जमावी आणि एखाद्याची का जमू नये ह्याला काही उत्तर नाही' असं  पु.ल. देशपांडे जे म्हणतात ना  ते मला फक्त माणसांपुरतं मर्यादित आहे असं वाटत नाही. अनेक गोष्टींशी आपलं जुळतं आणि अनेक गोष्टींशी जुळत नाही , का ते मात्र कळत नाही!
         तसंच म्हणायचं तर माझी शब्दांशी wavelength जुळली. सूर-लय-ताल वगैरे लोकांशी एकतर्फी प्रेम जुळलं (ज्याला आपण बाथरूम सिंगिंग म्हणतो न ते!) पण रंग-रेषा नी मला कधीच दाद लागू दिली नाही. खरतर माझे काका आजोबा प्रख्यात चित्रकार होते ! आणि बहिणीला सुद्धा या चित्रकलेची वगैरे फार आवड आहे.आई सांगते की ती शाळेत असताना तिची चित्रं काचफलकावर वगैरे लावत! ( तिचं नावच 'चित्रा' आहे ! हा भाग अजूनच निराळा) ,बाबा सुद्धा मला
लहानपणी 'सरस्वती' चे चित्र(अर्थात दसरा असेल तेव्हा) काढून देत ,किवा काही sketches वगरे पण काढू शकतात! इतकंच कशाला  माझी  जन्म तारीख आणी प्रसिद्ध चित्रकार  एम .एफ. हुसैन यांची जन्म तारीख एकच आहे . 
          असं सगळं नीट जुळून आलेलं असताना माझी पाटी त्याबाबतीत कोरीच राहिली.एकदा चौथी का पाचवीत असताना माझ्या काका आजोबांकडे चित्रकला शिकायला गेलो होतो… अर्थात मला त्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता पण माझी बहिण जायची म्हणून मी पण थोडे दिवस गेलो … तिथे त्यांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी अगदी मन लावून चित्रे घोटीत असत आणि लोकांची चित्रे काढून  रंगवून झाली तरी मी आपला काहीतरी सुरवात कशी करावी वगरे विचारात . 
तर एकदा झालं काय आजोबांनी मला त्यांच्या त्या कुंचले बुडवायच्या ग्लास मधलं पाणी बदलून आणायला सांगितलं. 
तेव्हाच माझ्या तेव्हा बाल असलेल्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती …. कारण ते पाणी घेऊन जाऊन नवीन पाणी न सांडता घेऊन येणं हे माझ्या दृष्टीने गंगा घेऊन येण्यासारखच कठीण होतं.  पण का माहित नाही सुदैवाने ते मी न सांडता घेऊन आलो आणि भलताच खुश होतो पण आजोबांचा चेहरा लालबुंद झालेला … मला कळेना नक्की प्रोब्लेम काय आहे ?… तर प्रोब्लेम असा झाला होता कि तो हातामधला ग्लास पूर्ण एकाग्रचित्ताने घेऊन येण्याच्या नादात मी पायाने; दुसरा एक खाली ठेवलेला ग्लास उडवला होता आणि त्यातल्या जलाचा एका पूर्ण झालेल्या चित्रावर अभिषेक झाला होता आणि ह्या अभिषेकाने मला कुठलही पुण्य लाभलं नाही हे वेगळं सांगायला नकोच… तिथून मी जी धूम ठोकली ती पुन्हा न परतण्यासाठीच. 
           पण भित्याच्या पाठच्या ब्राम्हराक्षासाप्रमाणे माझी पाठ चित्रकलेने ९वी पर्यंत सोडली नाही. मला मराठी, गणित समाजशास्त्र वगैरे विषयांचे पेपर्स देताना कधी इतकी भीती वाटली नाही… ती सगळी कसर चित्रकला भरून काढे . 
आमच्या शाळेत ह्या चित्रकला विषयाचे गुण धरत ,त्यामुळे कारण नसताना माझ्या वार्षिक प्रगती (????)पुस्तकातले टक्के कमी होत आणि माझा नंबर जाई. मी शाळेत फक्त दोन वेळा सुटकेचा निश्वास टाकला १ म्हणजे सातवीत हिंदी संपलं तेव्हा आणि २ म्हणजे नववी मध्ये चित्रकला सरली तेव्हा. महत्वाच्या दहावीला चित्रकाम नाही हे पाहून मी प्रचंड खुश झालो. (कित्येक लोकांचे चेहरे इथे पडले असतील माझी अरसिकता पाहून, पण त्याचे मला मुळीच काही वाटत नाही) . 
          अहो हे काम भलतंच अवघड हो! मी आपला एक ठरलेलं निसर्ग चित्र काढून गप्प बसायचो . त्यात सुद्धा विषय काहीही असुदे आपले वरती त्रिकोणी डोंगर त्यातून डोकावणारं सुर्यबिंब ( अर्थात पावसात खेळणारी मुले असा विषय असेल तर त्याला वजा करावा लागे आणि पाऊस दाखवावा लागे )मग दोन तीन पक्षी (२-३ लघुकोन करणाऱ्या रेषा) खाली एक भलं मोठं झाड (कागद संपवायचा हे एकच उद्दिष्ट!) आणि मग उरेल त्या जागेत विषयानुसार माणसे, तीदेखील पाठमोरी कारण तोंडावरचे भाव दाखवणं माझ्या कुंचल्याला बापजन्मात शक्य झालं नसतं . तर हे असं चित्र काढून सुटका नाही खडू किंवा water colors नी रंग भरायचे … थोडक्यात काढलेल्या चित्राची अजून वाट लावायची …हे सगळे द्राविडी प्राणायाम करून जर चित्र रंगवून झालंच तर त्यात कधी हातच पडे ,कधी कुंचला पडे ,कधी कधी तर चित्र वाळतच नसे मग मी बेंच वर उभा राही आणि डोक्यावर चित्राचा कागद धरून पंख्याखाली (तो सुरु असला तर !) धरे !
कारण ते सुकलं नाही तर सगळ्यांचे पेपर्स गोळा करून एकावर एक ठेवले कि आपल्या सोबत दुसऱ्याचही चित्र खराब होण्याची भीती. (माझं चित्र खराब आधीच असे ! त्यामुळे अजून फार खराब होऊ शकत नसे ती गोष्ट निराळी). 
        या  सगळ्या धामधुमीत एक चित्रकलेचा प्रकार त्यातल्या त्यात दिलासादायक होता तो म्हणजे 'मुक्तहस्तचित्र' हे त्याच्याशी माझी थोडीशी गट्टी जमू शकली कारण एका वर्तुळात किवा चौरसात अजून छोटे छोटे भौमितिक आकार काढून मग त्यात नागमोड्या रेषा वगैरे काढून त्यात रंग भरायला मला मजा वाटे ! … कारण इथे कसलच बंधन नसे , 
रंग बाहेर गेला म्हणून बिघडत नसे ! (या चित्राच्या बळावर मी चित्रकलेत पास होत असे ) त्याचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत . 
           चित्रकला,हस्तकला,कार्यानुभव  हे असले नाजूकपणे करण्याचे विषय आपल्याला कधी जमलेच नाहीत.
अर्थात चित्रकले प्रमाणे ह्या इतर लोकांनी फार वर्ष त्रास दिला नाही, म्हणजे इंग्रजांच्या राजवटीपुढे फ्रेंच-पोर्तुगीज यांचा जाच कमी वाटावा तशातली बाब . कागदाच्या घड्या घालून प्राणी वगैरे बनवणं किंवा लोकरीच्या वगैरे पिशव्या बनवणं हे प्रकार  कंटाळवाणेच असत ! ( बहुतेकदा वर्गात कसातरी वेळ काढून ,घरी आई ,आजी किंवा मोठी बहिण यांना मी कामाला लावे ,त्या सुद्धा आनंदाने करत ) एकदा ५ वी मध्ये असताना सुई मध्ये दोरा ओवायला जमेना… मी गेलो 
शिवणाच्या बाईंकडे माझं गाऱ्हाणं घेऊन … तर त्यांनी अस्खलित मराठी मध्ये 'मी तुझी व्यक्तिगत नोकर नाही ' असं म्हणून मला हाकलून लावलं (बाईंच  माहेर पुणे असावं …) मी तेव्हाचं ठरवलं ह्या बाईंची चांगली जिरवायची … मी घरी आलो तर आत्या आलेली होती  कदाचित श्रावण असेल आणि सवाष्ण म्हणून जेवायला…. मी रागातच घरी आलो आणि समोर आत्या दिसल्यावर माझे डोळे लकाकले ( माझ्या दोन्ही आत्या शिवणकाम,भरतकामात पटाईत आहेत ) मी त्या क्षणी जेवायलाही न बसता आत्या कडून सुई ओवायला शिकून घेतलं आणि लगेच लोकरीची सुई देखील ! आणी त्यावर साखळी कशी घालायची याचं ज्ञान घेतलं … त्यानंतर २ वर्षांनी त्याच बाई आम्हाला ७ वी मध्ये पुन्हा आल्या कार्यानुभावाला … त्या दिसल्या दिसल्या मी गपचूप दप्तरामधून लोकरीचा गुंडा आणि ती सुई काढली….आणि त्या काय बोलतायत वगैरे क्षुल्लक बाबींकडे लक्ष न देत लांबच लांब साखळी करायला सुरवात केली … शेवटी तास संपत आला तेव्हा खाली जमिनीला लोळेल इतकी लांब निरर्थक साखळी मी विणली … शेवटी त्यांनी मला पुढे बोलावलं आणि सगळ्या वर्गासमोर समोर त्यांनी मला विचारलं की तुझं काय सुरु आहे ते आम्हाला कळू शकेल का ?  ंमी म्हंटल काही  नाही हो स्वतःच स्वतः ची सुई ओवता आल्याच्या अत्यानंदाने हे कृत्य करतोय … त्या मनातल्या मनात जे समजायचं ते  समजल्या आणि मला शाबासकी देऊन म्हणल्या बघा पोरानो अशी जिद्द हवी ! मला मस्तपैकी आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. 
         तर सांगायचा मुद्दा असा की मी ठरवलं तर थोडसं हस्तकलेच्या कामात मदत करू शकतो ,उदाहरणार्थ घरगुती शिकवणीला जायचो तिथे आकाशकंदील ,पणत्या वगैरेंसाठी मदत केली तेवढीच ! पण तो माझा पिंड नाही … 
महत्प्रयासाने थोडंसं जमतं. पण हे सगळं ज्या मनुष्यांना जमतं न त्यांच्या विषयी मला अतीव आदर आहे. मला कुठे चांगली चित्र, शिल्पं वगरे दिसली कि मी त्यांच्याकडे आदरपूर्वक वगैरे पाहतो आणि त्यांच्या सौंदर्याचं कौतुक देखील करतो पण कोऱ्या नजरेने कारण त्यातून फारसा आनंद मला घेत येत नाही . engineering colleges मध्ये ज्याप्रमाणे पहिले assignments कोण लिहितो हे कळत नाही ना त्याप्रमाणे ही चित्रं कुठून सुरु होतात किवा करायची हे मला उमगत नाही . तेच एखादी सुंदर कविता वाचली किंवा एखादं सुंदर गाणं ऐकलं की माझे डोळे लकाकतात आणि शब्दांत वर्णन न करता येणारा आनंद मला मिळतो आणि मग दिवसभर तेच मनात आणि ओठांत घोळत असतं ,हे असं कधी चित्रांच्या बाबतीत मी अनुभवलं नाही. 
शाळेत मराठी हा विषय मला खूप आवडे आणि ८-९ वी पासून कवितांचा अर्थदेखील हळू हळू कळू लागला . 
शालेय काळात १० वी पर्यंत तबला शिकल्यामुळे असेल कदाचित पण संगीत ऐकायला आवडू लागलं . (१० वी नंतर विज्ञान शाखा निवडली आणि तबला सोडला ह्याचं मला आज वाईट वाटतं आणि १२ वी नंतर मराठी भाषेचा अभ्यास संपला याचंही तितकंच वाईट वाटतं ). 
          आज मागे वळून पाहताना आपल्याला चित्रकला कधी जमली नाही याचं दुखं मुळीच नाही,उलट ते शाळेतले, घरून चित्र ट्रेस करून नेउन तिथे छापल्याचे दिवस आठवून हसायला मात्र येतं.  काही गोष्टी आपल्यासाठी नसतात . आपल्याला थोडंफार लिहायला जमतंय न त्यामध्ये मी खुश आहे .त्यातून मला अपार आनंद मिळतोय . 
पण ह्याला एक अपवाद आहे , एखादी कविता किवा गोष्ट आणि त्यातला अर्थ प्रतीत करण्यासाठी म्हणून काढलेलं चित्र मात्र मला खूप आवडतं आणि भावतं कारण  त्यामुळे मूळ कवितेचा -गोष्टीचा आनंद द्विगुणीत होतो. 
      'स्पृहा जोशी' यांच्या 'लोपामुद्रा' या अप्रतिम काव्य संग्रहामध्ये 'सुमीत पाटील' ह्यांनी स्पृहाच्या प्रत्येक कवितेचा भाव दाखवणारं आणि कवितेच्या अर्थाला अजून गहिरेपणा प्राप्त करून देणारं अलौकिक चित्र काढण्याची किमया साधली आहे ,त्यांनी प्रस्तावनेत लिहिल्या प्रमाणे ही चित्र कुठही कवितेच्या पेक्षा वरचढ न ठरता उलट प्रत्येक रेषेतून कवितेचं 
सौंदर्य अजून वाढवतात. त्याच प्रमाणे पु .लं च्या 'अपूर्वाई' ह्या प्रवासवर्णनमध्ये त्यांच्या विनोद्बुधीला चित्ररूप देण्याची किमया चित्रकाराने साधली आहे ,ही अशी चित्रे असतील तर मग मात्र आपण खुश असतो .


           'लिओनार्डो  द विन्ची' यांचं  एक अप्रतिम विधान आहे ते मला खूप आवडतं …  
' Painting is a poetry that can be seen rather than felt and poetry is a painting that can be felt rather than seen '.
(बाकी या पलीकडे  माझा आणि चित्रकार  'विन्ची' साहेबांचा काहीही संबंध नाही  ) … 
                     - ओंकार करंदीकर . 

No comments:

Post a Comment