Saturday, September 28, 2019

किशोर कुमार आणि 'सॅड सॉंग्स' - ओंकार करंदीकर

किशोर कुमार आणि 'सॅड सॉंग्स' - ओंकार करंदीकर




           आभास कुमार गांगुली म्हणजे अर्थातच द ग्रेट जिनियस  'किशोर कुमार' हे एक प्रचंड मस्तीखोर ,खट्याळ, विक्षिप्त आणि तरीही  supremely talented आणि all rounder व्यक्तिमत्व होतं हे काही मी नव्याने सांगायला नकोच. या लेखात मी फक्त त्याच्या (एकेरी उल्लेख प्रेमापोटी ... जसं लता, आशा, रफी, मुकेश आपले तसा चं किशोर .. थोडा जास्तंच आपला वाटणारा )  गाण्यांविषयी बोलणार आहे आणि ते ही सॅड सॉंग्स  विषयी! 

            किशोर कुमार ची गाणी हा एक प्रचंड मौल्यवान असा ठेवा आहे. आपला मूड कसा ही असो त्याला सूट होणारं किंवा तो सुधारणारं किशोर चं गाणं असतंच. त्याची रोमँटिक, लटका राग दाखवणारी , नखरेल आणि यॉडलिंग असलेली अशी गाणी काही कमी नाहीत आणि ती ही ग्रेट चं आहेत. उदाहरणार्थ 'छोड़ दो आंचल ज़माना क्या कहेगा', 'पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले' ही देव साहेबांवर चित्रित झालेली (गाताना किशोर ने जी मस्ती गाण्यात आणलीये त्याचा पडद्यावर देव आनंद ने केलेल्या मस्ती मध्ये मोठा वाटा आहे) गाणी , किशोर आणि मधुबाला ची 'हाल कैसा है जनाब का' सारखी आशा सोबतची डुएटस किंवा  'मेरे सपनो की रानी कब आएगी तू ', 'पल पल दिल के पास तुम रहती हो' , 'रात कली एक ख़्वाब में आयी' ... ही आणि अशी अनेक रोमांटिक, काही  प्रचंड एनर्जी नी गायलेली, काही लयीशी खेळत गायलेली, काही अतिशय सॉफ्टली गायलेली गाणीही माझी आवडती आहेतच, पण ज्या गाण्यांसाठी मी किशोरदांचा मोठा चाहता आहे ती ही नव्हेत. ती आहेत त्याची धीर-गंभीर आणि पडद्यावर विमनस्क अवस्थेतल्या नायकावर ( बहुतांश वेळा राजेश खन्ना) चित्रित झालेली. इथे ही राजेश खन्ना ला मुद्दाम वेगळा अभिनय करावाच लागला नसेल इतकी किशोर ने गायलेली गाणी खोल परिणाम करणारी आणि भावनापूर्ण आहेत.

          रफी आणि  मुकेश ची गंभीर सॅड गाणी ही खूप सुंदर आणि परिणामकारक आहेतच आणि इथे कुठलीही तुलना करण्याचा हेतू नाही पण तरीही किशोर कुमार नी जेव्हा अशी गाणी गायली तेव्हा ती वेगळयाच लेव्हल ला तो घेऊन गेला आणि त्याचा परिणाम कित्येक पटीने जास्त झाला असं मला वाटतं..  निदान माझ्यावर तरी. त्याची शब्दफेक, त्याची इंटेन्सिटी, आवाजाच्या व्हायब्रेशनचा, ग्रेस नोट्स चा  सहज पण कमाल वापर आणि हे सगळं कुठलंही औपचारिक शिक्षण न घेता केवळ आपली आवड जोपासत स्वतःच्या मेहनतीने!


          किशोर कुमार नी सलिल चौधरी , हेमंत कुमार यांसारख्या अनेक मोठ्या संगीतकारां साठी गाणी गायली, पण बर्मन दादां (एस डी बर्मन ) सारख्या बुजुर्ग संगीतकारानी आणि नंतर त्यांच्या जिनियस पुत्रानी (आर डी बर्मन ) खऱ्या अर्थानी किशोर कुमार ला एक टॉप चा प्लेबॅक सिंगर बनवलं (बनवलं म्हणजे तो हिरा होताच, ह्यांनी त्याला पैलू पाडले किंवा त्याचा टॅलेंटचा  मॅक्सिमम वापर केला असं आपण म्हणू ). 

          'अमर प्रेम' (आनंद बक्षी- आर डी बर्मन- किशोर कुमार हे त्रिकुट कमाल होतं आणि अर्थात च पडद्यावर राजेश खन्ना ) मधली 'कुछ तो लोग कहेंगे' आणि 'चिंगारी कोई भड़के' ही दोन गाणी जरी फक्त किशोर गायला असता आणि बाकी काही गायला नसता तरीही तो तितका च महान असता, पण आपलं भाग्य की तो तेवढं चं नाही गायला. त्यानी लता-आशा-रफी सारखी १०-२० हजार गाणी गायिलेली नाहीत (कारण सुरवातीचा खूप मोठा काळ तो फक्त देव आनंद किंवा स्वतः साठी च गात होता ) पण तरीही जी गायली आणि त्यातली माझी काही अतिशय प्रिय गाणी इथे नमूद करतो ( हे मला किती माहित आहे हे सांगण्यासाठी नव्हे तर वाचकांपैकी ज्यांनी कोणी ती नसतील ऐकली तर जरूर ऐकून त्याच्या प्रेमात पडावं म्हणून).

           त्याचं अगदी सुरवातीचं 'दुखी मन मेरे' आणि त्या नंतर (कुठल्याही क्रमाने नाही, जशी आठवतील तशी नावं देतोय) , 'ज़िन्दगी के सफर में गुजर जाते हैं', 'मेरे नैना सावन भादो', 'दिल आज शायर है', 'मेरी भीगी भीगी सी' , 'मेरे मेहबूब क़यामत होगी' , 'वह शाम कुछ अजीब थी', 'दिल ऐसा किसीने मेरा तोडा' (ह्यातला तोडा हा शब्द किशोर कुमार ने जसा उच्चारलाय तसा संपूर्ण विश्वात कोणी उच्चारू शकणार नाही आणि ही अतिशयोक्ती नाही ), 'इस मोड से जाते है', 'मुसाफिर हूँ यारो' , 'बेक़रार दिल', 'तेरी दुनिया से होके मजबूर चला', 'घुँघरू की तरह बजता ही रहा हूँ मैं ',  'कोई होता जिसको अपना', 'तुम बिन जाऊ कहा' (हे च गाणं रफी ने ही गायलेलं आहे वेगळ्या स्टाईल नी) आणि शेवटी सबकुछ किशोर कुमार असलेलं 'आ चल के तुझे' हे गाणं . ही सगळी गाणी एक एक जीव ओवाळून टाकावा अशी गायलेली आहेत. अर्थात त्या गाण्यांच्या गीतकार आणि संगीतकार ह्यांना ही ते क्रेडिट जातंच पण ते स्वतःही मान्य करतील की ही च गाणी किशोर ऐवजी दुसरा कोणी गायला असता तर इतकी अप्रतिम झालीच असती असं नाही. अजून एक गाणं आहे पण ते फक्त ऐकायचं, बघायला जाऊ नका कारण खूप भ्रमनिरास होईल ते गाणं म्हणजे 'चलते चलते मेरे ये गीत याद रखना' (काही वेळा सुंदर गाण्यांची पडद्यावर वाट लावण्याचं काम ही पूर्वी झालेलं आहे याचं हे उत्तम उदाहरण).  


          कित्येकदा माणूस आपल्याला जसा बाहेरून दिसतो किंवा आहे असं दाखवतो तसा तो असतो असं नाही. सुरवातीला म्हंटल्या प्रमाणे प्रचंड खट्याळ, विक्षिप्त, रोमँटिक असं बाहेरून वाटणारं किशोर कुमार चं व्यक्तिमत्व असलं तरी आत खोलवर कुठेतरी तो खूप दुखावलेला असावा, सुरवातीच्या  स्ट्रगल च्या काळात त्याला इंडस्ट्री मधल्या काही लोकांनी ज्या प्रकारे वागवलं ( आणि तेच लोकं नंतर च्या काळात  त्याच्या दारात लोळण घेत होते) त्यामुळे आणि त्याच्या वैयिक्तक आयुष्यात ही त्याला जे अनुभव येत राहिले त्यामुळे असेल कदाचित पण ही सगळी वेदना त्याच्या सॅड सॉंग्स मध्ये दिसते. खोटा खोटा भाव आणून कोणी इतकं सुंदर परिणामकारक  गाऊ शकत नाही.

           किशोर कुमार च्या जन्माला ९० वर्ष होऊन गेली आणि तो या जगातून निघून जाऊन ही ३३ वर्ष झाली आणि तरीही माझ्या सारख्या पंचविशीतल्या तरुणाला त्याच्या गाण्यांनी इतकं प्रभावित करावं हा त्याच्या आणि एकूणच बॉलीवूड संगीताच्या 'गोल्डन एरा'तल्या गाण्यांचा कालातीत असल्याचा पुरावा आहे. माझ्या पिढीच्या फार कमी लोकांना जुनी गाणी आवडत असतील  (आणि असं नसेल तर मला आनंदच आहे) ते हा लेख वाचून रिलेट करू शकतीलच आणि जे नसतील ऐकत त्यांनी हा लेख वाचून जुनी गाणी ऐकायला सुरवात करायचं ठरवलं तर 'किशोर कुमार' सॉंग्स इज नॉट ऍट ऑल अ बॅड वे टू स्टार्ट विथ !! 
ओंकार करंदीकर 


8 comments: